टपरीधारकांचे रखडलेले पुनर्वसन होईपर्यंत कारवाई होऊ देणार नाही – लोणावळा टपरी संघटना

लोणावळा : लोणावळा शहरांमधील जुन्या टपरीधारकांचे पुनर्वसन होईपर्यंत कोणत्याही प्रकारची अतिक्रमण कारवाई लोणावळा नगर परिषदेला करू देणार नाही असा पवित्रा लोणावळा टपरी संघटनेच्या वतीने घेण्यात आला आहे. 2008 साली लोणावळा शहरामध्ये अतिक्रमण कारवाई राबवत साडेतीनशे टपऱ्या उध्वस्त करण्यात आल्या होत्या. राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार या टपऱ्यांचे पुनर्वसन करण्याचे निर्देश लोणावळा नगर परिषदेला देण्यात आले होते मात्र त्याप्रमाणे अद्याप जुन्या टपरीधारकांचे पुनर्वसन झालेले नाही. तसेच 2017 साली लोणावळा शहरातील टपऱ्या, पथारीधारक, हातगाडी धारक यांचा बायोमेट्रिक सर्वे शासनाकडून करण्यात आला आहे. जोपर्यंत या टपरी धारकांचे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत आम्ही लोणावळा नगर परिषदेला टपरीधारकांवर कारवाई करू देणार नाही. वेळ पडली तर लोणावळा नगर परिषदेवर मोर्चा काढू, आमदारांच्या निवासस्थानासमोर ठिय्या मांडू, माजी नगराध्यक्षांना घेराव घालू मात्र कारवाई कोणावरही होऊ देणार नाही. याकरिता लोणावळा शहरातील सर्व टपरीधारकांनी देखील एकत्र येऊन संघर्ष करण्याचा पवित्र घेणे गरजेचे असल्याचे मत लोणावळा शहर टपरी पथारी हातगाडी संघटनेच्या तातडीच्या बैठकीमध्ये व्यक्त करण्यात आले आहे.

लोणावळा शहरातील टपऱ्यांवर कारवाई करण्याचा विषय मागील काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आला आहे. आमदार सुनील शेळके यांच्या आढावा बैठकीमध्ये व तदनंतर लोणावळा नगरपरिषदेने माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांच्या मागणीनुसार लोणावळा नगरपरिषद प्रशासनाने घेतलेल्या दुसऱ्या आढावा बैठकीमध्ये देखील माजी नगराध्यक्ष सुरेखाताई जाधव यांच्याकडून मागील काही वर्षांमध्ये वाढलेल्या टपऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. 2017 नंतर झालेल्या टपऱ्यांवर 10 मार्च पर्यंत कारवाई न झाल्यास लोणावळा नगरपरिषद इमारतीसमोर टपऱ्या आणून टाकण्याचा थेट विचारा आमदार सुनील शेळके यांनी प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे लोणावळा नगरपरिषद प्रशासनाने देखील आतापर्यंत कारवाई करण्याच्या मोहिमेची तयारी सुरू केली आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर आज 24 फेब्रुवारी रोजी लोणावळा टपरी संघटनेच्या वतीने तातडीच्या बैठकीचे आयोजन केले होते. यामध्ये पुढील आठ दिवसांमध्ये लोणावळा शहरांमधील जुन्या व नवीन या सर्व टपऱ्यांची नोंदणी संघटने कडून केली जाणार आहे. 2008 च्या यादीप्रमाणे साडेतीनशे टपऱ्या व 2017 च्या बायोमेट्रिक सर्वे प्रमाणे 635 व्यवसायिकांच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत. या व्यतिरिक्त लोणावळा शहरांमध्ये अजून किती नवीन टपऱ्या हात गाड्या झाले आहेत याची देखील माहिती या नोंदीनंतर समोर येणार आहे. सदरची नोंदणी प्रक्रिया झाल्यानंतर त्यामध्ये टपरी व्यावसायिक, फिरते फेरीवाले व पथारीवाले अशा तीन प्रकारे व्यवसायाचे वर्गीकरण करण्यात येणार आहे.

या विषयी बोलताना लोणावळा टपरी संघटनेचे अध्यक्ष वसंत काळोखे म्हणाले, रस्त्यावर टपरी टाकून व्यवसाय करण्याची आम्हाला देखील हाऊस नाही.. लोणावळा नगरपरिषदेने टपरी धारकांचे शासनाच्या आदेशाप्रमाणे हॉकर्स झोन तयार करत पुनर्वसन करावे त्यानंतर जर कोणी रस्त्यावर टपरी टाकली तर त्यावर आपण जरूर कारवाई करावी. आत्ता देखील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांना आमचे समर्थन नाही. मात्र लोणावळा नगरपरिषदेने कारवाई करताना जाणीवपूर्वक व हेतुपुरस्सर जुन्या व्यावसायिकांवर कारवाई केली जात आहे. या कारवाईला आमचा विरोध असून जोपर्यंत जुन्या व्यवसायिकांचे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत आम्ही लोणावळा शहरामध्ये टपरी व्यवसायिकांवर कारवाई होऊ देणार नाही असे ठाम मत टपरी संघटनेचे पदाधिकारी वसंत काळोखे, गणेश चव्हाण, रमेश म्हाळसकर यांनी व्यक्त केले आहे.

पुनर्वसन झाल्यास मुख्य रस्त्यावर कोणीही येणार नाही

टपरी व्यवसायिकांचे हॉकर्स झोन तयार करत पुनर्वसन झाल्यावर मुख्य रस्त्यावर कोणीही व्यवसाय करायला येणार नाही. कुमार चौक ते भांगरवाडी दरम्यान होत असलेली वाहतूक कोंडी ही सर्वश्रुत आहे. मात्र त्याला टपरीधारक नव्हे तर लोणावळा नगरपरिषद प्रशासन यांचे चालढकल धोरण जबाबदार आहे. लोणावळा नगरपरिषदेने मुख्य बाजारपेठ वगळता बाकी ठिकाणच्या व्यवसायिकांचे लॉटरी पद्धतीने पुनर्वसन केले होते. मात्र मुख्य बाजारपेठेतील व्यवसायिकांना अद्यापही जागा उपलब्ध करून दिलेली नाही. ती जागा नगरपरिषदेने तात्काळ उपलब्ध करून द्यावी जेणेकरून बाजारभागामध्ये वाहतूक कोंडी होणार नाही असे देखील मत टपरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *