महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी व सुरक्षीत प्रवासासाठी नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे – डॉ सुरेशकुमार मेकला
खोपोली (प्रतिनिधी) : महामार्गावर होणारे अपघात टाळण्यासाठी समाजातील सर्वच घटकांनी संयुक्त प्रयत्न करायला हवेत. आपल्या मागे परिवार आहे, ही भावना सतत मनात असायला हवी. वाहन चालवताना शॉर्टकटचा वापर आणि नियम भंग झाल्यास स्वतः सोबत इतरांचा जीव धोक्यात येऊ शकतो. युवा पिढीनेही महामार्गावरील सुरक्षा या विषयाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. पुस्तकी शिक्षणापेक्षा महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी तारतम्य बुध्दीचा वापर व्हायला हवा किंबहूना रस्ते सुरक्षा अभियान हे जानेवारी महिन्या पुरते मर्यादित न रहाता वर्षाचे बारा महिने राबवणे गरजेचे आहे असे प्रतिपादन वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक डॉ. सुरेश कुमार मेकला यांनी केले. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पळस्पे केंद्रात, पोलीस अधिक्षक – महामार्ग सुरक्षा पथक रायगड परिक्षेत्र, यांच्या वतीने रस्ते सुरक्षा अभियान 2025 च्या अनुषंगाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.31 जानेवारी रोजी रस्ते सुरक्षा अभियान – 2025 च्या समारोपाच्या कार्यक्रमात महामार्गावरील अपघात टाळण्यासठी आणि तत्परतेने पोलीस यंत्रणेला अपघात प्रसंगी स्वयंस्पूर्तीने मदत करणाऱ्या अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामजिक संस्था, मृत्युंजय देवदूत, आय आर बी पेट्रोलिंग टीम, डेल्टा फोर्सचे जवान, देवदूत यंत्रणा, लोकमान्य हॉस्पीटलचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी तसेच पत्रकार आणि सामजिक कार्यकर्ते यांचा सत्कार डॉ.सुरेश कुमार मेकला यांच्या हस्ते करण्यात आला.अपघातात कशा प्रकारे मदत करता येऊ शकते याबाबत हेल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष गुरुनाथ साठेलकर यांनी माहिती दिली. तर सारथी सुरक्षा सेवा संस्थेचे अध्यक्ष विनय मोरे यांनी उपस्थितांना प्रवास करतांना सिग्नलची उपयुक्तता तसेच सुरक्षित प्रवासासाठी महत्वाच्या टिप्स दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्तविक तानाजी चिखले – पोलीस अधिक्षक महामार्ग सुरक्षा पथक रायगड यांनी, तर आभार प्रदर्शन ज्योत्स्ना रासम – उपविभागीय पोलिस अधिकारी रायगड यांनी केले.रस्ते सुरक्षा अभियाना अंतर्गत निबंध, वकृत्व आणि चित्रकला स्पर्धेत गुणांकन प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. महामार्ग वाहतूक पोलीस विभागासाठी आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धातील विजेत्या बोरघाट आणि पळस्पे केंद्राच्या टीमचाही पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात विक्रम कदम – उपविभागीय पोलिस अधिकारी खालापूर, पोलीस निरीक्षक विनोद माळवे, प्रभारी अधिकारी वैभव रोंगे, आरटीओ विभागाचे जय शेठे इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.