महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत रायगडचा सोहेल शेख रौप्य पदकाचा मानकरी
खोपोली : महाराष्ट्रात मानाची मानली जाणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने 22 ते 23 फेब्रुवारी दरम्यान पुणे जिल्ह्यातील लोणीकंद येथे संपन्न झाली.
रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना 55 किलो वजनी गटात कुस्तीमहर्षी भाऊ साहेब कुंभार कुस्ती संकुल खोपोलीचा तरुण व मेहनती पैलवान सोहेल शेख याने पहिल्या ग्रीको रोमन महाराष्ट्र केसरी स्पर्धेत वरिष्ठ गटातील कोल्हापुर, पुणे, नाशिक, सोलापुर येथील नामवंत मल्लांना अस्मान दाखवत अंतिम फेरीत प्रवेश केला.
अंतिम फेरीत अगदी शेवटच्या क्षणी सुवर्ण पदकाने हुलकावणी जरी दिली असली तरी तमाम प्रेक्षकांची मने जिंकत सोहेल यानी रौप्य पदकाची कमाई केली. विशेष म्हणजे सोहेल हा या स्पर्धेतील वयाने सर्वात लहान मल्ल असून ही त्याची वरिष्ठ गटातील पहिलीच स्पर्धा होती. सोहेल याला कुस्तीमहर्षी भाऊ साहेब कुंभार कुस्ती संकुलाचे संस्थापक अध्यक्ष तथा शासनाचा गुणवंत क्रीड़ा मार्गदर्शक पुरस्कार विजेते राजाराम कुंभार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. सोहेल सध्या स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या कांदिवली येथील कुस्ती सेंटरमध्ये महाराष्ट्र शासनाचे कुस्ती कोच अमोल यादव, राजसिंग चिकारा, शाम बुट्टा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.
रायगड जिल्ह्यासाठी ग्रीको रोमन प्रकारात महाराष्ट्र केसरीचे पहिलेच पदक पटकावण्याचा पराक्रम सोहेल याने केला आहे. या यशामुळे कर्जत खालापुरचे आमदार महेंद्र सदाशिव थोरवे, खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण, तहसीलदार अयुब तांबोळी, खालापुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ पंकज पाटील, खोपोली पोलिस निरीक्षक शीतल राउत, खालापुर पोलिस निरीक्षक सचिन पवार,रायगड जिल्हा क्रीड़ा अधिकारी कार्यालयाचे क्रीड़ा अधिकारी राजेन्द्र अतनुर, प्रकाश वाघ, राज्य क्रीड़ा मार्गदर्शक संदीप वांजळे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते मारुती आड़कर, खालापुर तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष डॉ सुनील पाटिल आणि सचिव जगदीश मरागजे इत्यादी मान्यवारांनी अभिनंदन केले.