लोणावळ्यात डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे स्वच्छता अभियान; 3.1 टन कचरा संकलित
लोणावळा: महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने लोणावळा शहरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. रविवारी (2 मार्च) आयोजित या अभियानात तब्बल 3,166 किलो (3.1 टन) कचरा संकलित करण्यात आला, ज्यामध्ये 3,046 किलो सुका आणि 120 किलो ओला कचरा होता.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर स्वच्छता अभियान राबवण्यात आले होते. लोणावळ्यासह तळेगाव आणि देहूरोड येथेही हे अभियान प्रभावीपणे पार पडले.
337 सदस्यांचा उत्स्फूर्त सहभाग
लोणावळा शहर व परिसरातील डोंगरगाव वाडी, तुंगार्ली, देवले, वेहेरगाव, कामशेत, नाणे, पवनानगर आणि आंबवणे या आठ श्री बैठकांमधील 337 सदस्यांनी अभियानात सहभाग घेतला. सकाळी 8:30 वाजता पुरंदरे मैदानावर सर्व सदस्य एकत्र आले. त्यानंतर प्रत्येक गटाला ठिकाणानुसार कामाचे नियोजन व साहित्य वाटप करण्यात आले.
14 किमी अंतरावर स्वच्छतेचा उपक्रम
स्वच्छता अभियान सकाळी 9:30 ते 10:30 या वेळेत पार पडले. यामध्ये नौसेना बाग ते हनुमान टेकडी, नीलकमल ते कैलास नगर, लाकडाची वखार रस्ता, लोणावळा पोलीस स्टेशन परिसर, खोंडगेवाडी ते वर्धमान सोसायटी, कुमार रिसॉर्ट ते कैलास पर्वत, कुमार रिसॉर्ट ते भंगारवाडी मुख्य बाजारपेठ या परिसरातील 14 किलोमीटर अंतराचे रस्ते झाडून स्वच्छ करण्यात आले.
संकलित कचरा लोणावळा नगर परिषदेच्या वरसोली येथील कचरा डेपोवर पाठवण्यात आला. प्रतिष्ठानच्या या उपक्रमामुळे शहर स्वच्छतेस मोठा हातभार लागला आहे.