लोणावळा शहरात पावसाचे थैमान; २४ तासांत ४३२ मिमी पावसाची नोंद
लोणावळा : घाटमाथ्यावरील पावसाचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळा शहरात १९ ऑगस्ट रोजी पावसाने अक्षरशः थैमान घातले. केवळ २४ तासांत तब्बल ४३२ मिमी (१७.०१ इंच) पावसाची नोंद झाली. मुसळधार पाऊस आणि त्यासोबत वाहणारे वेगवान वारे यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक भाग जलमय झाले आहेत.
जलमय झालेले भाग :
वलवण, नांगरगाव, बापदेव रोड, नारायणी धाम मार्ग, भद्रीविशाल सोसायटी परिसर, बसस्थानक रस्ता, शहाणी रोड, भांगरवाडी, रायवूड, तसेच शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांवर पाणी साचले. नवीन पोलीस स्टेशनसमोरील रस्ता देखील पाण्याखाली गेला. वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली.
नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागले :
इंद्रायणी नदी तसेच शहरातील सर्व नाले पूर्ण क्षमतेने वाहू लागले. अनेक ठिकाणी नाल्यांचे पाणी रस्त्यावर आल्याने परिस्थिती बिकट झाली.
प्रशासनाचे उपाय :
हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
लोणावळा नगरपरिषदेकडून खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील सर्व शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली.
नागरिकांनी महत्वाचे कारणांशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत नगरपरिषद प्रशासन मदतीस तयार असल्याचे आश्वासन दिले आहे.
पुराचा धोका नाही, पण सतर्कता आवश्यक :
परिसरातील धरणांमध्ये अद्याप पाणी साठवण्याची क्षमता असल्याने सध्या तरी पुराचा धोका नाही. मात्र नागरिकांनी सतर्क राहावे, मोठ्या प्रमाणात पाणी साचलेल्या ठिकाणी जाणे टाळावे तसेच झाडाखाली उभे राहू नये, असेही प्रशासनाने सांगितले.
पावसाची आकडेवारी :
यावर्षी आजअखेरपर्यंत लोणावळा शहरात ४८१० मिमी (१८९.३७ इंच) पावसाची नोंद झाली आहे.
मागील वर्षी याच कालावधीत ४५१४ मिमी (१७७.७२ इंच) पाऊस झाला होता.

