लोणावळ्यात अवजड वाहन वाहतूक बंदीचा आदेश कागदावरच; पोलिसांच्या डोळ्यासमोर वाहतूक सुरूच
लोणावळा : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील लोणावळा व खंडाळा शहरातून अवजड वाहनांची वाहतूक बंदी असतानाही ती सुरू असल्याचे वास्तव समोर आले आहे. जिल्हाधिकारी पुणे यांनी मनशक्ती ते खंडाळा दरम्यान सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत अवजड वाहनांना बंदी घालण्याचा आदेश काढला असून, या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी दिल्या आहेत. मात्र या आदेशाला डावलून अवजड वाहने अजूनही शहरातूनच धावत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. नागरिकांच्या सांगण्यानुसार, काही अवजड वाहन चालकांना महामार्ग पोलीसच आर्थिक तडजोडीअंती अंतर्गत रस्त्यांवरून जाण्यास परवानगी देत असल्याची चर्चा सुरू आहे.
मुंबई-पुणे महामार्गावर गवळीवाडा नाका व खंडाळा बाजारपेठ परिसरात वारंवार होणारी वाहतूक कोंडी आणि अपघाताच्या घटनांमुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन केले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बंदीचा आदेश जारी करून अंमलबजावणीची जबाबदारी लोणावळा शहर पोलीस व खंडाळा महामार्ग पोलीस यांना दिली होती. मात्र या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याने “पाणी नेमकं मुरतंय कोठे?” असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, महामार्ग पोलीस हे वाहतूक कोंडीच्या ठिकाणी न दिसता चौकीसमोर व टोल नाक्याजवळ तपासणी करण्यातच मश्गूल असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. तपासणीदरम्यान आर्थिक तडजोडी होत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. लोणावळा व खंडाळा महामार्ग पोलिसांच्या या वर्तनाविरोधात यापूर्वीच नागरिकांनी रास्ता रोको आंदोलनही केले होते.
द्रुतगती महामार्गावर विक्रेत्यांकडून खाद्यपदार्थ व चहा विक्रीसारखे अनाधिकृत व्यवसाय पोलिसांच्या डोळ्यादेखत सुरू असल्याने पोलीस प्रशासनावरील प्रश्नचिन्ह अधिक गडद झाले आहे. पुणे जिल्हाधिकारी व ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाला त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांकडूनच मूठमाती दिली जात असल्याचे चित्र समोर आले आहे. “आदेश न पाळणाऱ्यांवर कारवाई होईल,” असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने “हा सावळा गोंधळ सुरूच राहणार का?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

