नांगरगावात प्रचाराची जोरदार रंगत; विकासाची दूरदृष्टी असलेल्या सुभाष डेनकर व ब्रिंदा गणात्रा यांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद
लोणावळा : नांगरगाव प्रभागातील निवडणूक प्रचाराला दिवसेंदिवस रंगत येत असून विकासाच्या जोडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुभाष डेनकर आणि ब्रिंदा गणात्रा या दोन्ही भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना नागरिकांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. गावभाग आणि विविध सोसायट्यांमधील प्रचारादरम्यान नागरिकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षवेधी ठरत आहे.
मागील अनेक वर्षांपासून नांगरगावातील नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होत, सातत्याने संपर्कात राहणारे सुभाष डेनकर आणि नगरसेविका म्हणून प्रभावी कारभार केलेल्या ब्रिंदा गणात्रा या दोन्ही उमेदवारांच्या काम करण्याच्या वृत्तीला नागरिकांकडून दाद मिळत आहे. “खोटी आश्वासने नव्हे, तर आमच्या समस्या समजून घेऊन त्यावर काम करणारे लोकप्रतिनिधी हवेत,” अशी नागरिकांची थेट भूमिका आहे.
नांगरगाव प्रभाग हा गावठाण आणि सोसायटी अशा दोन विभागांत विभागलेला असून दोन्ही भागात वेगवेगळ्या समस्या आहेत. उद्यान, स्मशानभूमी, मुलांच्या खेळण्यासाठी जागा, ज्येष्ठांसाठी बसण्याची सोय, वॉकिंग ट्रॅक यांसारख्या मूलभूत सुविधा आजही उपलब्ध नाहीत. पावसाळ्यात सोसायट्यांमध्ये पाणी शिरणे, घरांचे नुकसान होणे यांसारख्या समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. मात्र, याकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
याउलट, नागरिकांच्या अडीअडचणीला तत्परतेने धावून जाणारा सुभाष डेनकर कुटुंब व मागील कार्यकाळात ठोस कामगिरी करणाऱ्या ब्रिंदा गणात्रा यांच्या उमेदवारीचे नागरिक स्वागत करत आहेत. दोन्ही उमेदवार भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक रिंगणात असून “काम करणारे उमेदवार” अशी त्यांची ओळख बळकट होत आहे.
गावाचा स्वाभिमान जपण्याच्या भूमिकेत असलेल्या नांगरगावातील स्वाभिमानी नागरिकांनी “पैशाच्या मोबदल्यात गावाचा मान विकत घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना यंदा योग्य धडा शिकवू” असा ठाम निर्धार व्यक्त केला आहे. विकासाला प्राधान्य देणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा संदेश गावातून स्पष्टपणे उमटताना दिसत आहे.

