अवैध धंदे करणारे व या धंद्यांना पाठीशी घालणाऱ्यांना आया बहिणींचा तळतळाट लागल्याशिवाय राहणार नाही – सुरेखा जाधव

लोणावळा : लोणावळा शहरात गेल्या काही दिवसांपासून पान टपऱ्यांवरून नशेली पदार्थांची विक्री सुरू आहे. सोबतच जुगार, मटका, गांजा, एम.डी. पावडर, व्हाईटनर, देशी व विदेशी दारूची बिनधास्त विक्री सुरू असून, हे सर्व अवैध धंदे पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे फोफावले असल्याचा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी केला आहे. याच निषेधार्थ सोमवारी (21 एप्रिल) सायंकाळी भाजपच्या वतीने लोणावळा शहर पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढण्यात आला.

     मोर्चादरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्याकडे कारवाईची मागणी करत निवेदन सादर करण्यात आले. भाजपच्या वतीने चेतावणी देण्यात आली की, जर पुढील आठ ते पंधरा दिवसांत अवैध धंद्यांवर कारवाई झाली नाही, तर लोणावळा शहर पूर्णतः बंद करून पोलीस ठाण्याच्या विरोधात भव्य स्वरूपात जनआंदोलन छेडण्यात येईल.

      या वेळी माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी आणि भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. तसेच काही स्थानिक महिलांनी आपल्या संतप्त भावना व दैनंदिन होत असलेला त्रास यावेळी व्यक्त करत पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर ठपका ठेवला आहे. यावेळी श्रीधर पुजारी म्हणाले, आम्ही “फक्त निवेदन देऊन आम्ही थांबणार नाही, योग्य ती कारवाई झाली नाही, तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत हा विषय पोहचवून, या अवैध धंद्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करू,” असे श्रीधर पुजारी यांनी स्पष्ट केले.

तरुणाई धोक्यात, कुटुंबांची वाताहत

शहरात वाढत्या व्यसनाधीनतेमुळे तरुणाई धोक्यात आली आहे. विशेषतः कॉलेज आणि शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी अमली पदार्थांच्या आहारी जात असून, त्यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले. नशेच्या आहारी गेलेले युवक घरी येऊन आई-वडिलांशी, बहिणीशी, पत्नीशी अरेरावी करतात, शिवीगाळ करतात आणि मारहाणही करतात, अशा तक्रारी वारंवार नागरिकांकडून येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

पर्यटनाचे केंद्र असलेल्या शहराला नशेचे ठिकाण बनवू नका

लोणावळा हे पर्यटन स्थळ असून देशभरातून येथे पर्यटक येतात. परंतु अनेक हायप्रोफाईल युवक-युवती सार्वजनिक ठिकाणी नशा करताना दिसतात, आणि त्याचा परिणाम स्थानिक युवकांवर होतो आहे. योग्य वेळी कारवाई न झाल्यास लोणावळ्याची ओळख ‘नशेखोरीचे केंद्र’ म्हणून होईल, असा गंभीर इशारा भाजपा नेत्यांनी दिला.

पान टपऱ्यांवर संशय, पोलीस दुर्लक्ष का करतात – नागरिकांचा आरोप

शहरात नव्याने मोठ्या प्रमाणावर पान टपऱ्या उघडल्या गेल्या असून, त्या टपऱ्यांवर रात्री उशिरापर्यंत गर्दी असते. या टपऱ्यांमधून कोणत्या प्रकारचे पदार्थ दिले जातात याची चौकशी होणे आवश्यक असतानाही पोलीस दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. या आरोपांवर उत्तर देताना पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी सांगितले, “कर्तव्यात कुचराई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. पान टपऱ्यांबाबत आणि इतर अवैध धंद्यांबाबत माहिती घेऊन तातडीने योग्य ती कारवाई करण्यात येईल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *