लोणावळा भाजप अध्यक्षपदासाठी चुरशीची शर्यत; १२ इच्छुक रिंगणात, अरुण लाड आघाडीवर
लोणावळा (प्रतिनिधी): लोणावळा शहर भारतीय जनता पक्षात अध्यक्षपदासाठी चुरशीची रस्सीखेच सुरू झाली असून, तब्बल १२ इच्छुकांनी आपले अर्ज पक्षश्रेष्ठींना सादर केले आहेत. सध्या चालू असलेल्या भाजपच्या संघटनात्मक फेररचनेच्या पार्श्वभूमीवर, लोणावळा शहर, कुसगाव आणि वाकसई या भागांचा समावेश असलेले नवे शहर मंडळ तयार होणार आहे. शहरी व ग्रामीण भागाचा समन्वय साधत हे नवे मंडळ उभारले जाणार आहे, त्यामुळे अध्यक्षपदासाठी स्पर्धा तीव्र झाली आहे.
सध्या अरुण वसंत लाड हे लोणावळा शहर मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पाहत असून, त्यांचा कार्यकाळ अजून दीड वर्ष उरलेला आहे. लाड यांनी यापूर्वी युवक मोर्चा अध्यक्ष आणि मावळ तालुका भाजप कार्याध्यक्ष अशीही जबाबदारी पार पाडली आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी शहरातील गट-तट विसरून सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्र आणण्याचे महत्त्वाचे काम केले आहे.
१४ एप्रिलला झालेली निर्णायक बैठक
१४ एप्रिल रोजी लोणावळ्यात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत अध्यक्षपदावर चर्चा झाली. यावेळी भाजपचे पुणे जिल्हा सरचिटणीस संजय रौंदळ, प्रदेश सदस्य जितेंद्र बोत्रे, माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, आणि अनेक आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत विद्यमान अध्यक्ष अरुण लाड, अनिल गायकवाड आणि आणखी दहा इच्छुकांनी आपले अर्ज सादर केले. यापैकी लाड आणि गायकवाड हे दोन प्रमुख दावेदार मानले जात आहेत. लाड यांचा कार्यकर्त्यांमधील संपर्क आणि निवडणूक काळातील कामगिरी यामुळे त्यांचे पारडे सध्या जड मानले जात आहे.
महायुतीला मिळवून दिले मोठे यश
2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये लाड यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना महायुतीला लोणावळ्यातून भरघोस यश मिळाले. त्यांनी तालुक्याच्या दौऱ्यांद्वारे कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून पक्षात एकजूट निर्माण करण्याचे प्रयत्न केले.
अध्यक्षपदावर अरुण लाड यांचाच दावा मजबूत?
जरी अध्यक्षपदासाठी १२ जणांनी इच्छुकता दाखवली असली, तरी अनेक आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी लाड यांनाच पुन्हा संधी द्यावी, अशी शिफारस भाजप पुणे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांच्याकडे केली आहे.
पक्षश्रेष्ठींचा निर्णय काय असेल, हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र सध्या तरी अरुण लाड यांचे नाव अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे स्पष्ट दिसून येते.

