लोणावळा पोलीस स्टेशनसमोर साडी दुकानात चोरी; सलग दुसऱ्या दिवशी गुन्हा, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
लोणावळा (प्रतिनिधी) – शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. डॉक्टर हिरालाल खंडेलवाल यांच्या घरावर सोमवारी रात्री सशस्त्र दरोडा पडल्याच्या केवळ 24 तासांतच, मंगळवारी रात्री लोणावळा पोलीस स्टेशनसमोरच असलेल्या ‘पैठणी हाऊस’ या साडी दुकानात चोरीची घटना घडली. तसेच, शेजारील सोनी इलेक्ट्रॉनिक्स या दुकानातही चोरीचा प्रयत्न करण्यात आला. या सलग घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे.
पैठणी हाऊस दुकानाचे मालक द्वारका सुनील ठोंबरे (वय 36, रा. डोंगरगाव, लोणावळा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दुकानातून चोरट्यांनी 25 हजार रुपयांची रोख रक्कम व सुमारे अडीच तोळ्याचे मंगळसूत्र लंपास केले. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, दोन चोरटे स्पष्टपणे दिसून येत आहेत. विशेष म्हणजे हे दुकान पोलीस स्टेशनपासून अवघ्या 100 मीटर अंतरावर आहे.
यापूर्वी, सोमवारी रात्री प्रधान पार्क परिसरातील डॉक्टर खंडेलवाल यांच्या बंगल्यावर सशस्त्र टोळीने (20 ते 22 जणांनी) दरोडा टाकून सुमारे साडेअकरा लाखांचा मुद्देमाल – सोनं, हिरे व रोख रक्कम लंपास केली होती. दरोडेखोरांनी पलायन करत असतानाही केवळ काही फुटांवर पोलीस गाडी असतानाही त्यांना अटक करण्यात पोलिसांना अपयश आले.
या घटनांमुळे पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मध्यवर्ती भागात सलग दोन दिवसांत घडलेल्या या गंभीर घटनांमुळे शहरात भीतीचं आणि संभ्रमाचं वातावरण पसरलं आहे. नागरिक व सर्वपक्षीय नेत्यांनी या घटनांचा तातडीने तपास करून दोषींना अटक करण्याची जोरदार मागणी लोणावळा भाजपा गटनेते देविदास कडू यांनी केली आहे.

