लोणावळा, इंदोरी व देहूरोड येथे डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे निर्माल्य संकलन अभियान
लोणावळा : डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या वतीने गणेशोत्सव काळात लोणावळा, इंदोरी व देहूरोड येथील विसर्जन घाटांवर भव्य निर्माल्य संकलन अभियान राबविण्यात आले.
लोणावळा येथे इंद्रायणी नदी घाट व लोणावळा धरण विसर्जन घाटावर सातव्या दिवशी तसेच अनंत चतुर्थीला हे अभियान पार पडले. तिर्थरूप डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि तिर्थरूप डॉ. श्री. सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डोंगरगाव, तुंगार्ली, कार्ला, देवले, अंबावणे व पवनानगर येथील 116 श्री सदस्य सकाळी 11 ते संध्याकाळी 8 पर्यंत या उपक्रमात सहभागी झाले. यावेळी 465 किलो निर्माल्य संकलित करण्यात आले. संकलित निर्माल्यातील प्लास्टिक व न कुजणारे घटक वेगळे करून उर्वरित जैविक निर्माल्याचे खत तयार केले जाणार असून ते प्रतिष्ठानच्या वृक्षारोपण मोहिमेत वापरले जाईल.
इंदोरी घाटावर 43 श्री सदस्यांच्या सहभागातून 1025 किलो निर्माल्य जमा करण्यात आले, तर देहूरोड येथे कामशेत, कान्हे, वडेश्वर, वडगाव, तळेगाव, इंदोरी, सोमाटणे, देहूरोड, चांदखेड, घोटवडे, हिंजवडी येथील 284 श्री सदस्यांच्या सहभागातून तब्बल 2000 किलो निर्माल्य संकलित करण्यात आले.
या उपक्रमामुळे इंद्रायणी नदी व स्थानिक जलस्रोतांमध्ये होणारे प्रदूषण टाळले जाणार असून, पर्यावरणपूरक पद्धतीने निर्माल्याचा पुनर्वापर होईल. प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, जल पुनर्भरण, रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप यांसह विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. त्यातच निर्माल्य संकलन या अभियानामुळे लोकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढवण्यास मदत होत असल्याचे सांगण्यात आले.

