खंडाळ्यात ७४ लाखांचे कोकेन जप्त; तरुणाला रंगेहात अटक

लोणावळा : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील खंडाळा हद्दीत अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने (कोल्हापूर कृती विभाग, पुणे) मोठी कारवाई करत सुमारे ७४ लाख रुपये मूल्याचे १४८ ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. या प्रकरणी सोनू सिताराम उपाध्याय (वय २८, रा. पनवेल) या तरुणाला अटक करण्यात आली आहे.

लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ ऑक्टोबरच्या रात्री खंडाळा येथील केरावाला सोसायटीजवळील अंधारात संशयितरीत्या घुटमळणाऱ्या सोनू उपाध्यायला पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्या झडतीदरम्यान खाकी चिकटपट्टीने गुंडाळलेल्या प्लास्टिक पिशवीत ७४ लाख रुपयांचे १४८ ग्रॅम कोकेन आढळून आले.

तपासात आरोपी मुंबईहून लोणावळा परिसरात विक्रीच्या उद्देशाने हे ड्रग्ज घेऊन आल्याचे उघड झाले आहे. पोलीस अंमलदार संतोष सोनवणे यांच्या फिर्यादीवरून लोणावळा शहर पोलीस ठाण्यात एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *