लोणावळा पोलीस दलात खळबळ ! पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्यासह चार जणांच्या तडकाफडकी बदल्या
लोणावळा : लोणावळा शहरात तीन दिवसांपूर्वी झालेल्या ॲड. अभय मराठे हत्या प्रकरणानंतर लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्यासह चार जणांच्या तडकाफडकी बदल्या झाल्या आहेत.
ॲड. अभय मराठे यांचा मृत्यू रायफल साफ करत असताना गोळी उडून झाला असल्याने या घटनेची लोणावळा शहर पोलिसांनी अकस्मात निधन अशी नोंद घेतली होती. मात्र मृतदेहाची पाहणी केली असता पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांना काही संशयास्पद आढळल्यामुळे त्यांनी पुणे ग्रामीण च्या एलसीबी पथकाला घटनास्थळी पाठवले. पुणे ग्रामीणच्या एलसीबी विभागाने अवघ्या दोन तासांमध्ये हा मृत्यू रायफल साफ करताना गोळी उडून झाला नसून ॲड. अभय मराठे यांच्या आजोबांनी गोळी झाडून त्यांची हत्या केली असल्याचे उघडकीस आणले. धक्कादायक अशा या प्रकरणाचा तपास करताना लोणावळा शहर पोलिसांनी हलगर्जीपणा केल्यामुळे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जाधव, पोलीस उपनिरीक्षक शेखर उर्फ आप्पा कुलकर्णी व पोलीस कॉन्स्टेबल वीरसेन गायकवाड यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी केलेले या कारवाईनंतर लोणावळा शहर पोलीस दलामध्ये मोठी खळबळ माजली असून लोणावळा शहर च्या पोलीस निरीक्षक पदाची सूत्रे पोलीस निरीक्षक महेश विधाते यांनी स्वीकारले आहेत. मागील काही दिवसांपासून लोणावळा शहरात कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उपस्थित झाला होता. मराठे प्रकरणापूर्वी एका हॉटेलचा वाद देखील विकोपाला गेला होता, अशा अनेक घटना एकामागून एक घडत गेल्या व त्या हाताळण्यात पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांना अपयश आल्याने त्यांची तडकाफडकी बदली झाली असल्याची चर्चा पोलीस दलात सुरू आहे.
पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी लोणावळा शहराचे सूत्रे हातात घेतल्यानंतर शहरातील वाहतूक व्यवस्था व येथील अमली पदार्थ या विरोधात ठोस पावले उचण्यास सुरुवात केली होती. आपल्या धडाकेबाज कामातून त्यांनी स्वतःचा ठसा शहरात उमटवण्यास सुरुवात केली होती मात्र ॲड. अभय मराठे प्रकरण हाताळण्यास त्यांच्याकडून हलगर्जीपणा झाला असल्याचे सांगितले जात आहे व त्याच कारणामुळे त्यांची ही बदली झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे.

