लोणावळ्यात १० वी आणि १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार सन्मान; शिष्यवृत्तीचेही वाटप!

श्री सत्यनारायण मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट आणि नगरसेवक मुबिन इनामदार यांचा कौतुकास्पद उपक्रम; ३ जून रोजी सोहळा

 

लोणावळा : दहावी (SSC) आणि बारावी (HSC) परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी लोणावळ्यात एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री सत्यनारायण मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट, लोणावळा आणि विद्यमान नगरसेवक मुबिन इनामदार यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव सोहळा आणि शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे आणि त्यांच्यात शैक्षणिक क्षेत्रात अधिक प्रगती करण्याची ऊर्जा निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून मावळचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके उपस्थित राहणार आहेत. तसेच, श्री सत्यनारायण मंदिर चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष व माजी नगरसेवक नितीन वि. अग्रवाल आणि विद्यमान नगरसेवक मुबिन इनामदार यांची देखील प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे.

 

शिष्यवृत्तीसाठी काय आहेत निकष?

 

या कार्यक्रमात गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप केले जाणार आहे. त्यासाठी आयोजकांकडून खालीलप्रमाणे पात्रता निकष निश्चित करण्यात आले आहेत :

गुणवत्ता : संबंधित विद्यार्थ्याला १० वी किंवा १२ वीच्या परीक्षेत ७५% किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे.

आर्थिक मर्यादा : विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपयांपेक्षा कमी असावे.

 

बुधवारी 3 जून 2026 रोजी सायंकाळी चार वाजता हॉटेल चंद्रलोक या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लोणावळा आणि परिसरातील सर्व पात्र विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक श्री सत्यनारायण मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट व नगरसेवक मुबिन इनामदार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

या स्तुत्य उपक्रमामुळे स्थानिक विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, या शिष्यवृत्तीमुळे अनेक गरजू विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मोठी मदत व सकारात्मक प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *