ओढ्यातील अतिक्रमणावरून प्रितीनगर सोसायटी आक्रमक; नगरपरिषदेची एलिको बिल्डर्सला काम थांबविण्याची नोटीस

लोणावळा : लोणावळा नगरपरिषद हद्दीतील तुंगार्ली–प्रिच्छली हिल परिसरातून जाणाऱ्या मोठ्या ओढ्यात अतिक्रमण करून संरक्षण भिंत उभारण्याचे काम सुरू असल्याचा आरोप प्रितीनगर सोसायटीच्या सदस्यांनी केला आहे. एलिको बिल्डर्स अ‍ॅन्ड डेव्हलोपर्स यांच्या वतीने ओढ्याच्या पात्रात पाईल फुटिंग घेण्याचे काम सुरू करण्यात आले होते. या कामामुळे ओढ्याचे पात्र मोठ्या प्रमाणात अरुंद होणार असून दुसऱ्या बाजूस असलेल्या सोसायटीच्या सुरक्षा भिंतीलाही धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

या प्रकाराविरोधात प्रितीनगर सोसायटीच्या सदस्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, मावळचे आमदार Sunil Shelke यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिल्यानंतर त्यांनी तत्काळ गंभीर दखल घेत लोणावळा नगरपरिषदेला संबंधित काम थांबविण्याच्या सूचना दिल्या. त्याबद्दल सोसायटीधारकांनी आमदार शेळके यांचे आभार मानले.

सोसायटी सदस्यांच्या मते, तुंगार्ली धरणापासून खंडाळ्यापर्यंत वाहणारा हा मोठा ओढा असून तुंगार्ली, गोल्ड व्हॅली आणि प्रिच्छली हिल परिसरातील पावसाचे पाणी तसेच सोसायट्यांचे सांडपाणी याच ओढ्यातून वाहून जाते. पावसाळ्यात या ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी येत असताना देखील स्वतःच्या फायद्यासाठी ओढ्याच्या पात्रात अतिक्रमण करून संरक्षण भिंतीसाठी पाईल फुटिंग घेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

यापूर्वी २०१३ साली देखील याच बिल्डरकडून ओढ्याच्या पात्रात बांधकाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यावेळी लोणावळा नगरपरिषदेने नोटीस बजावत नाला अथवा ओढ्याच्या पात्रापासून १५ मीटर अंतराच्या आत कोणतेही बांधकाम करता येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच नैसर्गिक नाला बुजविण्याचे करण्यात आलेले काम तात्काळ पूर्ववत करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. त्यानंतर तब्बल तेरा वर्षे हे काम बंद होते. मात्र आता पुन्हा एकदा शासनाची दिशाभूल करून ओढ्यात अतिक्रमण करत भिंत बांधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, २४ एप्रिल २०२६ रोजी लोणावळा नगरपरिषदेच्या नगररचना विभागाने आणि बीट अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. या पाहणीत ओढ्याच्या पात्रामध्ये संरक्षण भिंतीसाठी पाईल फुटिंग घेण्यात आल्याचे आढळून आले. त्यानंतर नगरपरिषदेकडून संबंधित बांधकाम व्यावसायिकाला नोटीस बजावण्यात आली. ओढा किंवा नाल्याच्या हद्दीपासून १५ मीटर अंतराच्या आत कोणतेही बांधकाम करता येणार नसल्याचे नोटिशीत नमूद करण्यात आले असून सुरू असलेले बांधकाम तात्काळ थांबवून जागा पूर्ववत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्यथा संबंधित बांधकाम परवानगी रद्द करून महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही नगरपरिषदेकडून देण्यात आला आहे.

मात्र नोटीस देऊन पंधरा दिवस उलटल्यानंतरही ओढ्यातील पाईल फुटिंग, लोखंडी सळ्या आणि इतर बांधकाम साहित्य अद्याप जागेवरच असल्याचा आरोप सोसायटी सदस्यांनी केला आहे. याशिवाय ओढ्यालगत दगडी भिंत बांधण्याचे कामही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणात नगरपरिषदेकडून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रितीनगर सोसायटीने केली असून आवश्यक वाटल्यास राष्ट्रीय हरित लवादाकडे दाद मागण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *