भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती लोणावळा शहरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी

लोणावळा : महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती लोणावळा शहरामध्ये मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. लोणावळा शहरांमधील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला 13 एप्रिल च्या रात्री बारा वाजता सामूहिक पुष्पहार अर्पण करण्यात आला. 14 एप्रिल रोजी सकाळपासूनच लोणावळा शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती पुतळा व समूह शिल्प येथील अर्धाकृती पुतळा या दोन्ही ठिकाणी लोणावळा शहर व ग्रामीण परिसरामधील भीम अनुयायांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. लहान मुलांपासून अबाल वृद्धांपर्यंत सर्वांनीच या ठिकाणी येऊन अभिवादन करत मेणबत्ती पेटवत बाबासाहेबांचे दर्शन घेतले.

लोणावळा शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील भीम जयंती चे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त जयंती महोत्सव समितीच्या वतीने अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत ज्यामध्ये मुलांसाठी व महिलांसाठी विविध स्पर्धा तसेच सांस्कृतिक व मनोरंजनाचे कार्यक्रम याचा सहभाग आहे. लोणावळा शहरामध्ये सर्वत्र स्वागत कमानी व रस्त्याच्या दुतर्फा साईड कनाती लावण्यात आल्यामुळे संपूर्ण परिसर हा उजळून निघाला आहे. महामानवांच्या पुतळ्यांना आकर्षक अशी विद्युत रोषणाई लोणावळा शहरामध्ये करण्यात आली आहे. लोणावळा शहरातील विविध भागांमधून तसेच ग्रामीण भागांमधून वाजत गाजत मिरवणूक लोणावळा शहरामध्ये आणण्यात आल्या होत्या. लोणार शहरामध्ये आल्यानंतर समूह शिल्प परिसरातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. येणाऱ्या नागरिकांच्या स्वागतासाठी अन्नदान तसेच पिण्याचे पाणी व सरबत वाटप वेगवेगळ्या पक्ष व संघटनांच्या माध्यमातून करण्यात आले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सूर्यकांत वाघमारे, लोणावळा नगर परिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांचे अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी तसेच विविध सामाजिक संघटनांचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी या ठिकाणी येत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करत दर्शन घेतले. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला बंधुतेचा व समतेचा संदेश मनात कायम ठेवत लोणावळा शहरामध्ये सामाजिक सलोखा जपत काम करण्याचा मनोमन निश्चय केला. कायदा व सुव्यवस्थेचा कोणत्याही प्रश्न निर्माण होऊ नये याकरता पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने मोठा बंदोबस्त देखील शहरांमध्ये लावण्यात आला होता.

 

नांगरगाव विहारांमध्ये स्वच्छता कर्मचारी व सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान

 

  1. नांगरगाव येथील नागसेन युवक संघ व रमामाता महिला मंडळ यांच्यावतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नांगरगाव परिसरामध्ये स्वच्छता दूत म्हणून काम करणाऱ्या सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांचा तसेच या भागातील लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्य करणाऱ्या प्रमुख कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. नांगरगाव येथील विहारांमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथील सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र निकाळजे यांच्या वतीने गावात जयंतीनिमित्त मिठाई वाटप करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *