लोणावळा शहरातील गुन्हेगारी रोखण्यात पोलिसांना अपयश – देविदास कडू
लोणावळ्यातील गुन्हेगारी व महिला अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी व येथील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी ठोस कारवाई न झाल्यास जन आंदोलनाचा इशारा
लोणावळा : लोणावळा शहरातील गुन्हेगारी रोखण्यात लोणावळा पोलिसांना अपयश आले असल्याचा गंभीर आरोप लोणावळा शहर भाजपाचे माजी नगरसेवक व गटनेते देविदास कडू यांनी केला आहे. लोणावळा शहरातील ही वाढत चाललेली गुन्हेगारी रोखण्यासाठी व येथील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्यास लोणावळा पोलिसांच्या विरोधात जनआंदोलन करण्याचा इशारा देविदास कडू यांनी दिला आहे.
देविदास कडू म्हणाले, मागील काही दिवसांमध्ये लोणावळा शहरामध्ये सातत्याने चोरीच्या व लुटमारीच्या घटना घडत आहेत, सोबतच महिला अत्याचाराचे प्रकार देखील वाढले आहेत. खुलेआम लोणावळ्यामध्ये ड्रग्स व गांजा यांचे सेवन व विक्री सुरू आहे हे सर्व घडत असताना लोणावळा पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई होताना दिसत नाही. पोलिसांचा गुन्हेगारांवर कोणतेही प्रकारचा वचक राहिलेला नसल्याने लोणावळा शहरांमधील कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. लोणावळा शहरातील प्रसिद्ध डॉक्टर खंडेलवाल यांच्या घरावर पडलेल्या सशस्त्र दरोडात देखील अद्याप कोणत्याही प्रकारची प्रगती झालेली पुढे आलेली नाही. त्यानंतर लोणावळा बाजार भागामध्ये व आता मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर देखील चोऱ्यांच्या घटना घडू लागले आहेत. लोणावळा शहरांमधील देवालय सुद्धा या चोरट्यांच्या तावडीतून सुटलेली नाहीत. बहुतांश सर्व विभागातील मंदिरांमध्ये चोऱ्या घडल्या आहेत. अशी भीषण परिस्थिती असताना लोणावळा शहरातील नागरिकांनी कोणाच्या भरवशावर राहायचे, लोणावळ्यातील नागरिकांच्या सुरक्षेतील जबाबदारी कोण घेणार असे प्रश्न देविदास कडू यांनी उपस्थित केले आहेत.
पोलिसांचा वचक गुन्हेगारांवर राहिलेला नाही तसेच पोलिसांकडून दिवसा व रात्री ज्याप्रमाणे गस्त होणे अपेक्षित आहे ती गस्त देखील होत नसल्यामुळे गुन्हेगारी वाढू लागली आहे. लोणावळ्यातील नागरिक हे स्वतःला असुरक्षित समजू लागले आहेत याला जबाबदार कोण? पोलीस स्थानकामध्ये तक्रारी देऊन देखील कारवाई होत नाही. एका महिलेने काही मुलांकडून नोकरी व शिक्षण या बहाण्याने गंडा घालत मोठ्या प्रमाणात पैशांची लूट केली आहे मात्र त्यावर देखील तक्रार करून कारवाई होत नाही ही येथील शोकांतिका आहे. पोलिसांनी त्यांच्या कामकाजामध्ये सुधारणा न केल्यास व लोणावळा शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी ठोस पावले न उचलल्यास लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या विरोधात जनआंदोलन करण्याचा इशारा देविदास कडू यांनी दिला आहे.
भर दिवसा महिला अत्याचाराच्या घटना
लोणावळा शहरामध्ये भर दिवसा महिला अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. ठोंबरेवाडी येथील अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाची घटना ही कायदा व सुव्यवस्था ढासळली असल्याचे लक्षण आहे. खुलेआम लोणावळा शहरामध्ये गुन्हेगार गुन्हे करत आहेत मात्र त्यांच्यावर कठोर कारवाई होत नसल्याने लोणावळा शहरांमधील महिला असुरक्षित आहेत. महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या व मंगळसूत्र सोडण्याचे देखील अनेक प्रकार घडले आहेत. या वाढत्या गुन्हेगारीमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाहतूक नियोजनाचे तीन तेरा
लोणावळा शहर हे पर्यटनाचे ठिकाण आहे. विविध राज्यांमधून पर्यटक या शहरांमध्ये पावसाळी पर्यटनासाठी येत असतात. असे असताना देखील लोणावळा शहर पोलीस स्टेशन कडून येथील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी कोणतेही प्रकारचे नियोजन करण्यात न आल्यामुळे मागील दोन महिन्यापासून लोणावळा शहरांमधील वाहतूक कोंडीचे तीन तेरा वाजले आहेत. लोणावळा, खंडाळा, जुना खंडाळा, भांगरवाडी, नांगरगाव, वलवण, भुशी, रायवूड या सर्व भागातील नागरिक अक्षरशा वाहतूक कोंडीने हैराण झाले आहेत. किरकोळ अंतर जाण्यासाठी स्थानिक नागरिकांना तासनतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे. पूर्वी पावसाळी पर्यटनाचे पोलीस स्टेशन कडून नियोजन केले जात होते. वेगवेगळ्या रस्त्यांवर एकेरी वाहतुकीचे प्रयोग केले जात होते. आता मात्र पोलिसांनी हे सर्व नियोजन बासनात बसवून ठेवले आहेत. केवळ एक-दोन चौकामध्ये पोलीस उभे ठेवून आम्ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी फार काही करत आहोत असा दिखावा शहरात सुरू आहे. पोलिसांच्या हप्ते खोरीमुळे मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर वलवन या ठिकाणी मॅप्रो गार्डन समोर वाहतूक कोंडीचा नवीन पॉईंट तयार झाला आहे त्याचप्रमाणे नार्झर कॉर्नर या ठिकाणी नव्याने वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. काही व्यवसायिकांसोबत असलेले हितसंबंध जपण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना या कोंडीमध्ये अक्षरशः ढकलून दिले जात असल्याचा गंभीर आरोप देविदास कडू यांनी पोलीस प्रशासनावर केला आहे.
मॅप्रो गार्डन कडून बॅरिकेट घेत लोणावळा शहरातील व्यापाऱ्यांची कोंडी
मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर वलवण या ठिकाणी ज्या मॅप्रो गार्डन मुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यावर कारवाई करण्याऐवजी त्या मॅप्रो गार्डन कडून बॅरिकेट घेत लोणावळा शहरातील मावळी पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान बॅरिकेट लावत शहरातील लहान मोठ्या व्यापाऱ्यांची कोंडी करण्याचा उद्योग पोलिसांनी केला आहे. बाजारपेठेतील रस्ता हा अरुंद आहे त्यातच सदरचे बॅरिकेट लावण्यात आल्यामुळे एक जरी वाहन रस्त्यावर अथवा रस्त्याच्या कडेला उभे राहिल्यास दुसरे वाहन पुढे जाऊ शकत नाही त्यामुळे लोणावळा बाजारपेठेमध्ये कृत्रिम वाहतूक कोंडी निर्माण होऊ लागली आहे. स्थानिक व्यवसायिकांनी याबाबत पोलिसांना सुचित करून निवेदने देऊन सुद्धा त्यावर कोणतेही कारवाई होत नाही. जाणीवपूर्वक लोणावळा बाजारपेठे मधील व्यवसायिकांना त्रास देण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. ज्या मॅप्रो गार्डन मुळे मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे त्यावर पोलीस का कारवाई करत नाहीत असा प्रश्न देखील देविदास कडू यांनी उपस्थित केला आहे.

