अधिकारीच कार्यालयात बसत नसल्याने नागरिकांनी तक्रारी कोणाकडे मांडायच्या; गटनेते देविदास कडू यांचा संतप्त सवाल
लोणावळा : लोणावळा नगर परिषदेचा कारभार सध्या सैरभैर झाला असून कार्यालयामध्ये अधिकारीच बसत नसल्याने नागरिकांनी आपल्या समस्या कोणाकडे मांडायच्या असा संतप्त सवाल लोणावळा नगर परिषदेचे माजी गटनेते व भाजपाचे माजी नगरसेवक देविदास कडू यांनी उपस्थित केला आहे. संपूर्ण लोणावळा शहराचा कार्यभाग ज्या नगरपरिषद कार्यालयामधून चालतो त्या नगर परिषदेवर मागील साडेतीन-चार वर्षापासून प्रशासक आहे मात्र प्रशासक योग्य प्रकारे काम करत नसल्यामुळे या लोणावळा नगर परिषदेला कोणी वाली राहीला आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
लोणावळा नगर परिषदेची मुदत संपल्यामुळे 2021 सालापासून लोणावळा नगरपरिषदेवर प्रशासक नियुक्त आहे. नगरपरिषदेचा संपूर्ण कारभार हा मुख्याधिकारी व प्रशासक यांच्या अधिकार कक्षेत सुरू आहे. सध्या पावसाचे दिवस सुरू असल्यामुळे वेगवेगळ्या भागांमध्ये अनेक समस्या निर्माण होत आहेत. नागरिक या समस्या घेऊन नगरपरिषद कार्यालय मध्ये येतात मात्र मुख्य अधिकारी यांच्यासह सर्वच विभागाचे कक्ष हे रिकामी असतात. कोणत्याही कक्षामध्ये अधिकारी भेटत नसल्यामुळे नागरिकांनी आपल्या समस्या आपल्या तक्रारी कोणाकडे मांडायच्या असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कार्यालयीन कामकाजाच्या वेळेमध्ये अधिकाऱ्यांनी कक्षामध्ये उपलब्ध राहून नागरिकांच्या समस्या सोडवणे गरजेचे आहे मात्र तसे होताना दिसत नसल्यामुळे येथील कारभार हा आंधळा कारभार सुरू असल्याचे कडू यांनी म्हटले आहे.
देविदास कडू म्हणाले, 23 जुलै रोजी माननीय उच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी घेताना लोणावळा नगरपरिषदेला नवीन विकास आराखडा तयार करणे तसेच येथील अतिक्रमणे, व भौतिक सुविधांबाबत काही मार्गदर्शक सूचना केले आहेत त्याबाबतची माहिती घेण्यासाठी आज लोणावळा नगर परिषदेमध्ये आम्ही आलो होतो मात्र या ठिकाणी कोणीही जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हता. सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत आम्ही नगरपरिषद कार्यालयामध्ये होतो. नगरपरिषद कार्यालयामध्ये एवढा अंदाधुंद कारभार सुरू असेल तर नागरिकांचे प्रश्न सुटणार कसे असा प्रश्न त्यांनी यानिमित्त उपस्थित केला असून प्रशासनाने याबाबत योग्य दखल न घेतल्यास प्रशासनाच्या विरोधात वेगळी भूमिका घ्यावी लागेल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

